नवी मुंबई - कोरोनाग्रस्त पतीला विलगिकरण करण्यासाठी पत्नीने घराच्या गॅलरीमध्ये सोय केली होती. मात्र याचा राग अनावर होऊन झालेल्या वादातून कोरोनाग्रस्त पतीने पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डोक्यात कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी पनवेल जवळील करंजाडे वसाहतीत घडली.
याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तो कोरोना पॉझिटिव असल्याने त्याला उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेला कोयता घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आला आहे. संतोष पाटील(40) असे आरोपी पतीचे, संध्या पाटील(35) असे मृत पत्नीचे नाव आहे.
विलगीकरण करून ठेवल्याने पतीचा राग अनावर:
करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर 4 प्लॉट नंबर 20 साई सत्यम सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर पाटील दाम्पत्य राहत होते. पत्नी संध्या हिने संतोष आजारी असताना औषध उपचार करण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन न जाता त्याला गॅलरीत चार ते पाच दिवस विलगीकरण करून ठेवले होते. हाच राग अनावर झाल्याने संतोष याने संध्या बरोबर वाद घातला. त्यावेळी राग अन्वर झालेल्या संतोषने मासे कापण्यासाठी लागणारा कोयता संध्या हिच्या डोक्यात घालून तिचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व पती संतोष याला ताब्यात घेतले.
परिसरात हळहळ
सध्या कोरोनामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होणे, कठीण झाले आहे. त्यातच उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही येत आहे. अशा परिस्थितीत पनवेल मध्ये घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाटील कुटुंबीयांना एक मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे.