पनवेल (रायगड) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने 3 जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. परंतु नागरिकांचा वावर काही कमी होताना दिसत नाही. बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी कायम असल्याने लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, आता बहुतांशी अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात येणार असून, सर्वच ठिकाणचे काऊंटर सेल बंद करण्यात आल्याने रुग्णसंख्या घटत असल्याची माहिती पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.
पालिका प्रशासनाने 3 जुलैला काढलेल्या नव्या परिपत्रकानुसार पनवेल महापालिका क्षेत्रात अन्नधान्य, भाजीपाला, अंडी, फळे, बेकरी, दूध, मासळी, चिकन, मटण आदींसह इतर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दिल्या जात आहेत. लॉकडाऊनमध्ये कठोरता आणण्याचा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कोविडची साखळी तोडण्यास मदत करणे आहे. त्यानुसार पनवेल शहरातील औषधांची दुकाने व वैद्यकीय सेवा वगळता शहरात खरेदी-विक्री 3 जुलैपासून बंद करण्यात आली आहे.
शहरातील दुकानात, बाजारात होणारी गर्दी आपोआपच कमी झाली आहे. याचे सकारात्मक परिणाम पनवेलमधील वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येवर झाले असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. येत्या 10 दिवसांत नागरिकांचा असाच प्रतिसाद मिळाला तर कोरोनासारख्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला आहे.