रायगड - कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये पोलीस दल आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत रायगड जिल्हा पोलीस दलातील 127 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 50 हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिली.
सभा, आंदोलने, मोर्चे, मंत्र्यांचे दौरे, धार्मिक सण वा कोणती आपत्ती आली की, पोलीस नेहमी पुढे येऊन कर्तव्य बजावतात. कोरोना संकट काळातही कोरोनाबाधीत क्षेत्रात पोलीस सेवा देत आहेत. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अलिबागच्या पोलीस मुख्यालयात 60 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. तसेच नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत करार देखील केला आहे, असे अधिक्षक पारस्कर यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस दलातील सर्वांची अँटीजेन व अँटीबॉडी तपासणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 127 जण कोरोनाबाधित आहेत. यातील सौम्य लक्षणे असलेले 73 जण घरात राहून उपचार घेत आहेत तर 54 जणांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. एखाद्याची तब्येत नाजूक असेल तर त्यांना डी वाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून अप्पर पोलीस अधिक्षक, डीवायएसपी हे त्यांचे मनोधैर्य वाढवत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिली.