पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या ३ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे होत आहेत. या मेळाव्यात उमेदवार मात्र जनतेच्या विचाराने दिला जाईल, असे सांगितले होते. आज अजित पवार यांनी भरसभेमध्ये जनतेला उमेदवारांची नावे सांगत तुमचा उमेदवार कोण असे विचारले. यावेळी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाला जनतेने पसंती दिली. उपस्थितांनी कोल्हे यांचे नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा दिल्या.
शिरूर लोकसभा व आंबेगाव विधानसभा या दोन्ही मतदारसंघात आढळराव पाटील, वळसे पाटील हे दोघे पूर्वीचे मित्र असून त्यांच्यात साटेलोटे असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. ही अनेक दिवसांची खदखद आज वळसे पाटलांनी भर सभेत मांडली. मी पक्षाचा आहे, पक्षाशी कधीच गद्दारी करणार नाही. त्यामुळे जनतेने अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. जनतेने मतदानाच्या रूपातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करावे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आंबेगाव तालुक्यातून जास्त मताधिक्य देण्याचे आवाहन केले.
अनेक दिवसांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे उमेदवार असल्याची चर्चा होती. मात्र, आता अजित पवारांनी जनतेतूनच उमेदवाराची विचारणा केली असता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना नागरिकांनी पसंती दिली आहे. मात्र, येणाऱ्या काळामध्ये ही उमेदवारी कोल्हे यांना देऊन लांडे यांना नाराज करणे राष्ट्रवादीला परवडणार आहे का? हा एक प्रश्न आहेच.