पुणे : '2019 मध्ये आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो, त्याच शिवसेनेसोबत आम्ही दोन महिन्यानंतर सरकार स्थापन केलं. मग आता आम्ही भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी झालो तर काय बिघडलं', असे मत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय. तसेच, 'आम्ही आमची शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा सोडलेली नाही', असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून शनिवारी पुण्यात शहर कार्यकारणीचे नियुक्तीपत्रक वाटप व मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
आम्ही आमची विचारसरणी सोडणार नाही : 'अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिक निर्णय घेतलाय. याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलीय. अजित पवारांनी हा निर्णय का घेतला याची कारणे त्यांनी दिली आहेत. राज्यात काम करत असताना आमची जी विचारसरणी आहे ती आम्ही सोडणार नाही. आत्तापर्यंत जे आले नाहीत, ते देखील आता आमच्या सोबत येणार आहेत', असे सुनील तटकरे म्हणाले.
..म्हणून अजित पवार सत्तेत सहभागी : राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. 'अजित पवारांनी हा निर्णय फक्त विकासासाठी घेतलाय. आंदोलनं, मोर्चे करून नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी सत्तेत सहभागी व्हावं लागतं. म्हणून अजित पवार सत्तेत सहभागी झालेत', असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. 'अजित पवारांवर जर कोणी टीका करत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही', असा सज्जड दमही चाकणकर यांनी यावेळी दिला.
अजित पवारांना मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही : या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर उपस्थित होते. 'अजित पवार यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज्यात एक वेगळं वातावरण तयार झालंय. शरद पवार आमचे दैवत आहे. परंतु एखाद्या नेत्याने कितीवेळा अन्याय सहन करावा', असे दीपक मानकर म्हणाले. 'छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना अठरा पगड जातींच्या लोकांनी साथ दिली होती. तशीच साथ आम्ही देखील देणार आहोत. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही', असा विश्वास मानकर यांनी यावेळी व्यक्त केला.
70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर उत्तर दिलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावर तटकरे यांनी उत्तर दिलंय. 'या आधी देखील अशा पद्धतीचे आरोप झाले आहेत. 2014 ते 2019 पर्यंत राज्यात भाजपाचं सरकार होतं, तेव्हा याबाबत सखोल चौकशी झाली. चौकशीचे निकष जनतेच्या समोर आहेत. न्यायालयाने देखील त्याबाबत योग्य ते निर्णय घेतलाय. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला', असे तटकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा :