पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या शहरातील बाधित रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पुढे आहे. यावर लस नसल्याने केवळ जनजागृती करून नागरिकांना आवाहन करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हेच पाहता पिंपरी-चिंचवड शहरात उड्डाण पूल, भिंती यांवर कोरोनासंदर्भातील जनजागृती करण्यात येत आहे. त्यात आता मराठी, हिंदी चित्रपटांच्या डायलॉगची भर पडली आहे. त्यामुळे भिंतीवरील चित्र अधिक बोलके ठरत आहेत. कोरोना जनजागृती बाबत महानगरपालिका कुठेच कमी पडणार नाही, असे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. सध्या हा आकडा 60 हजारांच्या पुढे असून दररोज झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जनजागृती करून नागरिकांपर्यंत सर्व माहिती पोहोचवण्याचे काम पालिकेने केले आहे. भिंतीवरील बोलकी चित्र पाहून नागरिक नियमांचं पालन करत असल्याचं शहरात दिसत आहे.
शहरातील उड्डाण पूल, बीआरटी मार्ग, पार्किंगच्या भिंती या कोरोना जनजागृतीमुळे बोलक्या झाल्या असून हिंदी चित्रपटातील डायलॉग यावर दिसत आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींपर्यंत समतोल सांभाळला असून चित्रांमधून संस्कृतीवर भर देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्रातील लोकधारा, चार्लीन चापलीन, आर. के. लक्ष्मण, मोटू पटलूसह अनेक व्यक्तींचे चित्र भिंतीवर रेखाटली आहेत.