बारामती - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती नगरपरिषद प्रशासन आणि शासन यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांना अनुसरून उपाययोजना करत आहे. नगरपरिषदेमध्ये कोरोना विषयक मदतीसाठी कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना यापूर्वीच केली आहे. त्यामधून कोरोनाबाधितांचा शोध घेणे, रुग्णांना रुग्णालय व्यवस्थेबाबत माहिती देणे, रुग्णांचा कोरोना आजाराबाबत पाठपुरावा घेणे इत्यादी कामे या कक्षांमधून केली जातात.
या आहेत सूचना...
शहरातील एकूण ४६ शाळा, कॉलेज, खासगी शिकवणी वर्ग, लायब्ररी, ग्रंथालयांना १४ मार्च २०२१ पर्यंत आपल्या संस्था बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. सध्या लग्नसराई सुरू असून लग्न कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे शासनाकडून प्राप्त सूचनांना अनुसरून शहरातील ३२ लग्नकार्यालय व सभागृहे यांना प्रत्यक्ष भेटी देऊन क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत कोरोना कालावधीत लग्नसमारंभ आयोजनाबाबत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. ल
ग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठी कार्यालयांमध्ये दोनशेपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत. समारंभात उपस्थित सर्व वऱ्हाडी, वाढपी, आचारी, आयोजक यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. तसेच वातानुकूलित सेवेचा (एसीचा) वापर न करणे बाबत, प्रवेशद्वारावर ऑक्सीमिटर, थर्मल स्कॅनिंग मशीनचा वापर करणे, उपस्थितांचे नाव, संपर्क तपशील ठेवणे, तसेच लग्न कार्यालयाची मुख्य इमारत व संपूर्ण परिसर सॅनिटायझर ने निर्जंतुकीकरण करणे इत्यादी सूचना देण्यात आल्या आहेत.
घरोघरी जाऊन सर्वेक्षण...
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे घरोघर जाऊन ऑक्सीमिटर, थर्मल स्कॅनिंग मशीनद्वारे कॉन्टॅक्ट टेसिंग करण्याचे काम पुन्हा चालू केले आहे. अतिजोखमीच्या सहवासीच्या लक्षणानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तात्काळ टेस्टिंग अथवा आरटीपीसीआर नमुना तपासणी करून अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरण करणे, किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याबाबत सूचना देखील करण्यात येत आहेत. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामधील नर्सेस मार्फत दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.
कारवाईची मोहीम तीव्र...
शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसाठी पोलीस विभाग, परिवहन विभाग व नगरपरिषद यांच्या सहकार्याने शहरांमध्ये विना मास्क फिरणाऱ्या, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुकंणाऱ्या नागरिकांना दंड करून कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. कोरोना विषयक नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्था व लग्न कार्यालये यावर ही दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशी माहिती बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली.
हेही वाचा - स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम