पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये निगडीच्या भक्ती शक्ती चौकाजवळ कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्रीच्या सुमारास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातातील कंटेनर चालक फरार झाला असून त्याचा देहूरोड पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा - बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या; नोकरीच्या आमिषाने सोडले होते घर
या अपघातात सौदागर दशरथ लोंढे (वय 27), ऐश मोहम्मद खान (वय 23 दोघेही रा. मोरेवस्ती चिखली) यांचा मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्वर दत्तू कांबळे (वय 26) असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा भरधाव वेगात दुचाकी भक्ती शक्ती चौकाच्या दिशेने जात होती. यावेळी अचानक कंटेनर समोरून वळताना दिसला. मात्र, दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून थेट चाकाखाली गेली. यात दोघांच्या अंगावरून कंटेनर गेला. या अपघातात एक जखमी झाला आहे.
हेही वाचा - कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
दरम्यान, कंटेनर चालक हा फरार झाल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली असून त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून भक्ती शक्ती चौकात पुलाचे काम सुरू आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्या प्रमाणे वाहतूक सुरळीत करण्यात वाहतूक पोलिसांनी यश आलेले नाही. नेहमीच येथे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या दोघांच्या मृत्युला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.