बारामती (पुणे ) - बारामती तालुक्यातील एकूण २२ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या 'समृध्द गाव' स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. लोकसहभागातून काही गावात खूप चांगले काम झाले आहे. सर्व ग्रामस्थांनी गाव पातळीवर नियोजन करुन स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला हवे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केले.
ग्रामस्थांच्या सहभागामुळे गावे टँकरमुक्त -
पाणी फाऊंडेशचे काम करत असताना बहुतंश ठिकाणी चांगली कामे झाली आहेत. ग्रामस्थांच्या चांगल्या सहभागामुळे काही ठिकाणी गावे टँकरमुक्त झाली आहेत. ही एक चांगली बाब आहे. शासकीय योजनांना लोकसमुहाची जोड मिळाली, तर खुप चांगले काम होऊ शकते. बारामती तालुक्यातील २२ गावांपैकी ५ गांवानी स्पर्धेचे निकष पूर्ण केले आहेत. बाकीच्या गावांनीही स्पर्धेचे निकष पूर्ण करुन त्यात सहभागी व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहे. बारामती तालुक्यात पाणी फाऊंडेशने प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय चांगला आहे. असाच समन्वय टिकवून ठेवून चांगल्या प्रकारे कामे करा, असेही त्यांनी सांगितले.
समृध्द गावासाठी सहा स्तंभ -
'सत्यमेव जयते वॉटरकप' स्पर्धेचा भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा ४५ दिवसांची होती. यात प्रथम तीन तालुके सहभागी झाले होते. यासाठी ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पाणी फांऊडेशनच्यावतीने जलव्यवस्थापन करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा लाभ प्रत्येक गावाने घ्यावा. तसेच गावातील पाणीसाठ्यानुसार पिकांचे नियोजन करणेदेखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समृध्द गावासाठी एकूण सहा स्तंभ आहेत. त्यामध्ये जल व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पौष्टिक गवताचे संरक्षित कूरण क्षेत्र, वृक्ष व जंगलाची वाढ, माती पूर्नजीवित करणे आणि गावकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आदी गोष्टींचा यामध्ये समावेश असून प्रत्येक स्तंभाला गुण देण्यात येतील. शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, हंगामनिहाय कोणती पिके घ्यावीत, याबाबतची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - शेतकरी आंदोलनावर जगभरातून प्रतिक्रिया, सेलिब्रिटींची #IndiaAgainstPropagenda मोहिम