पुणे - "एकच लक्ष.. दोन कोटी वृक्ष" उपक्रम हाती घेऊन शाळेतील चिमुकल्यांसह शिक्षकांनी विठू-माऊलीच्या जयघोषावर ठेका धरला. ही अनोखी दिंडी खेड तालुक्यातील पश्चिम डोंगराळ आदिवासी भागातील कोहिंडे शासकीय माध्यमिक आश्रम शाळेने काढली आहे.
कोहिंडे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी जीव, जल, आणि जंगल यांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष दिंडीचे आयोजन करून त्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या माध्यमातून एक हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. वृक्षदिंडी पारंपारिक पालखीसह वेशभूषा करून त्यामध्ये विठ्ठल रूखमाई, संत ज्ञानेश्वर मुक्ताई, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांनी परंपरागत वेशभूषेतील पात्रांनी दिंडीचे लक्ष वेधून घेतले.
हरिनामाचा जयघोष करत निघालेली ही दिंडी आंबोली व कोहिंडे येथील ग्रामदैवत असणाऱ्या मंदिरांना भेटी देऊन मार्गस्थ झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी तसेच पंचक्रोशीतील अनेक महिला व पुरुषांनी भक्तिभावाने सहभाग घेतला होता. दोन्ही गावांत प्रथेनुसार पालखीचे विधीवत पूजन करून स्वागत करण्यात आले.
काही काळासाठी अत्यंत भव्य अशा पंढरीच्या वारीत सहभागी झाल्याचा अनुभवच मिळत असताना चिमुकल्यांकडून पाणी आडवा पाणी जिरवा, वृक्ष हेच जीवन, अशा अनेकविध संकल्पनेचे संदेश दिले जात होते.