जुन्नर (पुणे) - माळशेज घाटातील करंजाळे येथील खिंडीजवळ बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी धोकादायक दरड असल्याने माळशेज घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे.
यात भाजीपाला, शेतमाल, प्रवासी वाहतूक यांचा खोळंबा झाला होता. मात्र, आज (दि. 6 ऑगस्ट) सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने घाटातील रस्ता खुला करण्यात आला आहे. सध्या वाहतूक सुरळित सुरू आहे.
पावसाळ्यात माळशेज घाटात अनेक ठिकाणी धबधबेच असतात. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या घाटात गर्दी करत असतात. कोरोनामुळे यंदा पर्यटकांसाठी हा घाट बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, वाहतूकीसाठी हा मार्ग खुला आहे.