पुणे - दिवाळीनिमित्त पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रेल्वे आणि एसटी बसेसचे आरक्षण 'फुल्ल' असल्याने प्रवासी नाईलाजाने खासगी बसचा पर्याय निवडतात. त्याचा फायदा घेऊन खासगी बसचालकांकडून भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली जाते. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला ऐन सणासुदीत झळ बसत असून मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. जादा दर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तिकीटदरात दुप्पट ते तिप्पट वाढ
दिवाळी सुटीत रेल्वे, एसटी बसेस प्रवाशांची मोठी गर्दी असते. परिणामी, नाइलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. प्रवाशांची गरज आणि गर्दीचा फायदा घेत ट्रॅव्हल्सचालकांकडून तिकीटदरात दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात येत आहे.
डिझेल दरामुळे नाइलाजास्तव दरवाढ
मागील 18 महिन्यांपासून राज्यातील खासगी बस वाहतूक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली असून सातत्याने वाढणाऱ्या डिझेल दरामुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे दिवाळीत नाइलाजास्तव बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. परगावातून किंवा परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अतिशय नगण्य असते. त्याचाही परिणाम दर वाढण्यावर होणार आहे, असे वाहतूकदारांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांना मात्र प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत, असे ट्रॅव्हल्स चालकांचे म्हणणे आहे.
असे आहेत ट्रॅव्हल्सचे दर
मार्ग | जुने दर | नवे दर |
पुणे-नागपूर | 1 हजार 200 | 2 हजार 500 |
पुणे-इंदूर | 1 हजार 600 | 2 हजार 600 |
पुणे-गोवा | 1 हजार 300 | तीन हजार |