पिंपरी चिंचवड - पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे, एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना शुक्रवारी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट 5 आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
गुरुदास उर्फ पिल्या सदाशिव तेलंग असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव होते. तर देवेंद्र नाना जाधव, मयूर उर्फ नच्या अभिमान शिंदे, शुभम संजय भापकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील देवेंद्र जाधव आणि गुरुदास तेलंग यांचे वर्षभरापूर्वी भांडण झाले होते. याच रागातून मित्रांच्या मदतीने गुरुदासची हत्या केल्याची कबूली आरोपीने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास इंदोरी येथे तीन जणांनी मिळून कॅडबरी कंपनीसमोर गुरुदास तेलंग याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून, त्याची हत्या केली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुरुदास याच्या भावाने गुरुदासचे वर्षभरापूर्वी देवेंद्र जाधव याच्याशी भांडन झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपींना नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.