पुणे - डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील एका घरी ज्येष्ठ डॉक्टरचा मृतावस्थेत आढळून आला आहेत. तर त्या डॉक्टरच्या बहिणीचा देेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ सुबीर सुधीर रॉय (वय 68) आणि जितीका सुधीर रॉय (वय 65, श्वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. डॉ सुबीर रॉय हे नामवंत नेत्रतज्ञ होते. येरवडा आणि विश्रांतवाडी परिसरात त्यांचे क्लिनिक आहे.
प्रभात रस्त्यावरील एका घरात डॉ. सुबिर रॉय हे बहीण जितीका आणि भाऊ संजय रॉय (वय 65) यांच्यासह एकत्र राहत होते. जितिका व संजय यांची मानसिक स्थिती योग्य नाही. त्यांची देखभाल डॉ. सुबीर रॉय हेच करत होते. दरम्यान डॉ. रॉय यांचे एक नातेवाईक त्यांना तीन दिवसांपासून संपर्क करत होते. परंतु फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यानंतर हे नातेवाईक स्वतः प्रभात रस्त्यावरील त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांना हॉलमध्ये जितिका या बेशुद्धावस्थेत होत्या. तर संजय हे घरामध्ये बसले होते. डॉक्टर रॉय यांची खोली बंद होती आणि त्यातून दुर्गंधी येत होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घरी जाऊन दरवाजा तोडत आत प्रवेश केला. स्वच्छतागृहात डॉ. रॉय मृतावस्थेत पडले होते. त्यानंतर पोलिसांनी बेशुद्धावस्थेत असलेल्या जितीका यांना रुग्णालयात हलवले. रुग्णालयात उपचार सुरू असताना जितीका यांचा देखील मृत्यू झाला. तर तपासणीअंती डॉक्टर सुबीर रॉय यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
डॉक्टर रॉय हे नामवंत नेत्रतज्ञ होते. दररोज दुचाकीने विश्रांतवाडी आणि येरवडा येथील क्लिनिकमध्ये जात असत. ते प्रकृतीने देखील मजबूत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात ते भिजले होते. त्यामुळे त्यांना सर्दी, ताप झाला होता. दोन-तीन दिवसांपासून ते क्लिनिकमध्ये गेले नव्हते. त्यांचा फोन लागत नसल्यामुळे नातेवाईकांनी घरी येऊन पाहणी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला