पिंपरी चिंचवड Shiv Sena MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अवघ्या काही वेळात देणार आहेत. आज दुपारी 4 नंतर कधीही हा निकाल जाहीर होऊ शकतो. मात्र, या निकालाची आम्हाला शून्य उत्सुकता असून, आम्ही पुढील निवडणुकांच्या तयारीला लागलो आहोत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलीय. शिंदे गटातील आमदार सत्यमेव जयते असे म्हणतात. मात्र, ते तसं नसून सत्तामेव जयते असं त्यांना म्हणायचंय असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय.
त्यावर बोलायचं नाही : सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर देखील अध्यक्षांनी खूप कालावधी निकाल देण्यासाठी लावला आहे. हा निकाल टोलवत नेण्याचा प्रयत्न झाला असा आरोपही अंधारे यांनी केलाय. उशिरा न्याय म्हणजे अन्यायच असं म्हणत त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधलाय. तसंच, या प्रकरणाचा निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो? यावर मला काही बोलायचं नाही असंही अंधारे यावेळी म्हणाल्यात.
आज देणार निकाल : शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेची सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, तीन महिन्यांच्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठक : शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी निकालाला काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे सुद्धा वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल घोषित झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेवर याचा कुठलाही परिणाम होऊ नये, या संदर्भातसुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ही बैठक सुमारे एक तास 50 मिनिटं चालली.
हेही वाचा :
1 आमदार अपात्रतेचा निकाल कसा असेल? खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 'ही' दिली माहिती
2 विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी देणं चुकीचं, आमदार अपात्रता सुनावणीपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचं मत
3 शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सायंकाळी साडेचार वाजता लागणार निकाल, वाचा सविस्तर