पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जीम चालकांची बाजू मांडत राज्यात जीम सुरू करा असे म्हटले. यामुळे जीम चालकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. आज (बुधवार) पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी शहरातील जीम सुरू करण्याबाबत जीम चालकांना आवाहन केले आहे. तसेच पोलिसांनी त्रास दिल्यास मनसे खंबीरपणे पाठीशी राहील, असे म्हणत थेट पोलिसांना आवाहन दिले आहे.
हेही वाचा - शिर्डी साई मंदिरात मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता
गेल्या साडेचार महिन्यापासून कोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरासह राज्यातील जीम बंद आहेत. मात्र, सर्व व्यवसाय, हॉटेल्स, मॉल्स यांना अटी आणि शर्थीसह सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर जीम चालकांनी जीम सुरू करण्याबाबत विविध स्थरावर राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अखेर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जीम चालकांनी भेट घेऊन कैफियत मांडली. राज यांनी जीम चालकांचे म्हणणे एकूण घेत अटी आणि नियमांचे पालन करून जीम सुरू करा. पाहुयात काय होते ते, असे म्हणताच जीम चालकांमध्ये उत्साह दिसत आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी थेट पोलिसांना आवाहन दिले असून जीम चालकांनी जीम सुरू कराव्यात, पोलिसांनी त्रास दिल्यास पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये जीम सुरू झाल्यास त्याला मनसे पाठिंबा देणार हे स्पष्ट झाले आहे.