पुणे - जुन्नर तालुक्यात शेतकर्यांच्या मालाचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. बोरी गावातील शेतकरी बारकु प्रभाकर जाधव यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पपईची बाग अज्ञात समाजकंटकांनी उध्वस्त केल्याने शेतकर्यावर मोठे आभाळ कोसळले आहे.
बारकु जाधव यांनी हजारो रुपये खर्चून ही पपईची बाग उभी केली होती. काही दिवसांतच या बागेतून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार होते. मात्र, अशातच पपईच्या बागेत घुसून सुमारे ४०० ते ५०० नग पपई तोडून जागेवरच फेकून देण्यात आल्याने या शेतकर्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. पपई बागेचे नुकसान केल्यानंतर या समाजकंटकांनी आपला मोर्चा रंजन जाधव यांच्या कलिंगड बागेकडे वळवला. या बागेतील ३५ ते ४० कलिंगडे फोडून व कलिंगड वेल तोडुन मोठे नुकसान करण्यात आले. वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी या घटनांना गंभीरतेने घेऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत.