पुणे - शहरातील वाढत कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने संभाव्य धोका लक्षात घेऊन शहरातल्या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेडची संख्या वाढवायला सुरुवात केली आहे. रुग्णसंख्या वाढली तर बेड कमी पडतील आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये, वेळेत बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी काही बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी शहरातील खासगी रुग्णालयांंना दिले आहेत.
खासगी रुग्णालयाला बेडचा डॅशबोर्ड रोज अपडेट करणे बंधनकारक
गेल्या वर्षी खासगी रुग्णालयांनी जेवढे बेड राखीव ठेवले होते, त्याच्या 50 टक्के बेड सध्या कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पुढे आवश्यकता भासल्यास त्यात वाढ केली जाणार आहे. सोबतच खासगी रुग्णालयाला बेडचा डॅशबोर्ड रोजच्या रोज अपडेट करणे बंधनकारक असणार आहे. रुग्ण भरती करून घेण्यास खासगी रुग्णालयाने टाळाटाळ केली तर कारवाईचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. खासगी रुग्णालयातीलही बेड कमी पडले तर, जम्बो कोव्हीड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा विचार असल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांंनी सांगितले आहे.
4 हजार बेड उपलब्ध होणार
पालिकेने खासगी रुग्णालय प्रमुखांची बैठक घेत याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आता या माध्यमातून पालिकेला 4 हजार बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती भारती यांनी दिली आहे. शहरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ दिसून येत असताना महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलून या ठिकाणी बेड राखीव ठेवण्याच्या संदर्भात कारवाई होत असतानाच दुसरीकडे महापालिकेच्या पथकांकडून शहरात ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे की नाही, याची पाहणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर होतोय का, याचीदेखील पाहणी केली जात आहे.