पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दिवसभरात ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आता शहरातील बाधितांची संख्या १५१ वर पोहोचली आहे. तर, आत्तापर्यंत ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील दोघांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे कोरोनामुक्त थेरगाव आणि रुपीनगर येथील आहेत. दरम्यान, शहरातील आणि शहराबाहेरील एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दीडशे पार झाली आहे. मात्र, हे दुर्दैवी असले तरी कोरोनाला रोखणे हे केवळ नागरिकांच्या हातात आहे. कोरोना विषाणूविषयी सर्वांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंगचेदेखील पालन करणे महत्त्वाचे आहे.
आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवड हद्दीत ३ जणांचा तर हद्दीबाहेरील ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १५१ पैकी, ६२ जण कोरोनामुक्त झालेले आहेत, हे नक्कीच समाधानकारक आहे. दरम्यान, गुरुवारी आढळलेले रुग्ण हे चिंचवड, वाकडेवाडी, पिंपळे गुरव, तळवडे, खराळवाडी या परिसरातील असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.