पुणे - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोविशिल्ड लसीची ऑर्डर मिळाल्यानंतर या लसींची वाहतूक करण्यासाठी पुण्यातल्या आकुर्डी येथे सज्ज असलेले कोल्डस्टोरेज कंटेनर हे हडपसर येथे असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटकडे रवाना झाले होते. पोलिस बंदोबस्तात हे सहा कोल्डस्टोरेज कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. हे कंटेनर देशभरात पाठवले जाणार आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्डचे पाच कोटी डोस तयार आहे. यासोबतच, पुढील डोसेसचे उत्पादनदेखील सुरू झाले आहे. आता या लसी घेऊन जाणारे कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमधून कधी बाहेर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गरज पडल्यास ट्रकची संख्या वाढवणार -
देशभरात लस पोहचवण्याचे मोठे आव्हान वितरकांवर असणार आहे. कारण सीरम इन्स्टिट्यूटवरून विमानतळ आणि पुढे त्या-त्या राज्यातील संबंधित विमानतळावरून कोल्ड स्टोरेज डेपोपर्यंत लस पोहचवण्याची जबाबदारी या कंपन्याना पार पाडावी लागणार आहे. यासाठी 300 कोल्ड ट्रक सज्ज करण्यात आले आहेत. मात्र, गरज लागल्यास आणखी 200 ट्रक उपलब्ध करून देण्याची तयारी या कंपन्यांनी केली आहे.
१६ तारखेपासून सुरू होणार लसीकरण -
१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. यामध्ये सुरुवातीला तीन कोटी वैद्यकीय आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ५० वर्षांपुढील लोकांना ही लस देण्यात येणार आहे, तसेच याच टप्प्यात ५० वर्षांहून कमी असलेल्या मात्र गंभीर आजार झालेल्या रुग्णांनाही लस देण्यात येईल. या लसीचा एक डोस केवळ २०० रुपयांना उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सुरूवातीला महाराष्ट्रातली दोन जिल्ह्यात ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. यासाठी मुंबई आणि जालना या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा - आनेवाडी टोलनाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह १८ जण निर्दोष