पुणे - सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक मनाच्या श्लोकाचे पठण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न केला. यावेळी 'मना सज्जना भक्ती पंथेची जावे', या मनाच्या श्लोकाबरोबरच 'जय जय रघुवीर समर्थ' हा जयघोषही आसमंतात दुमदुमला. या जागतिक विक्रमाच्या उपक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी यावेळी हजारो पुणेकरांनी अनुभवली.
पुणे शहर आणि उपनगरांतील ६४ शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. निनाद पुणे, ओरायन स्टुडिओज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारिका साऊंड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर १२ हजार शालेय विद्यार्थ्यांनी 'श्री मनाच्या श्लोकाचे' पठण केले. या उपक्रमाचे मुख्य संयोजक निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, ओरायन स्टुडियोजचे आशिष केसकर, समर्थ व्यासपीठ पुणेचे डॉ.राम साठये, द्वारिका साऊंड पुणेचे बाबा शिंदे यांनी आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त निवडक २१ मनाचे श्लोक व पाठाची निर्मीती मनशक्ती संस्थेने केली. तसेच या संस्थेचे मयूर चंदने गिनीज विक्रमाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. संगीतकार आशिष केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी २१ मनाचे श्लोक सादर केले.
जागतिक विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड व संस्थांशी समन्वयक म्हणून मिलिंद वेर्लेकर यांनी काम पाहिले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बसण्याकरीता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तर, प्रत्येक विद्यार्थ्यांना स्टिकर स्कॅन करून आतमध्ये सोडण्यात येत होते. याद्वारे सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येची अचूक मोजणी करण्यात आली. गिनीज व्यवस्थापनाकडून या उपक्रमाबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले असून त्यातील नियम व अटींचे पालन करून कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला होता. याशिवाय अग्निशामक दल, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे यांसह प्रेक्षकांना बसण्याकरीतादेखील स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती.