शिक्रापूर (पुणे) - तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रस्त्यालगत गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.
तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रस्त्यालगत एका ढाब्यासमोर दोन युवक गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, नाईक योगेश नागरगोजे, लक्ष्मण शिरसकर व त्यांच्या टिमने तळेगाव ढमढेरे न्हावरा रस्त्यालगत असलेल्या न्यू अर्जुन ढाब्यासमोर सापळा लावला होता. त्यावेळी दोन संशयित युवक दुचाकीहून त्याठिकाणी आल्याचे पोलिसांना दिसले. परंतु पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही युवक पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करत त्या दोन्ही युवकांना पकडले असता त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल व तीन जीवंत काडतुसे मिळून आली.
यावेळी पोलिसांनी स्वप्निल पोपट खटाटे (२२, रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) व माणिक विलास मापारे (३५, सध्या रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) या दोघांना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील कोणत्याही ठिकाणी नागरिक विनापरवाना हत्यारे वापरत असतील व नागरिकांना याबाबत माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९९२३६०००१७ या क्रमांकावर संपर्क साधावा व माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल, असे आवाहन शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.