पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज ट्विटरवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. धमकी देणाऱ्याने 'तुमचा दाभोलकर होणार', असे ट्वीट केले आहे. यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणी शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.
'पोलीस दलावर माझा विश्वास' : शरद पवार म्हणाले की, 'राज्याच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रश्नावर आपले मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र कुणी कुणाला धमक्या देऊन आवाज बंद करेल असे वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी धमकीची चिंता करत नाही. मात्र ज्यांच्या हातात सत्तेची सूत्रे आहेत, त्यांना देखील आपली जबाबदारी टाळता येणे शक्य नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांची प्रतिक्रिया : या प्रकरणी विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालून या मागचा मास्टरमाईंड कोण? याचा शोध घेतला पाहिजे. तसेच त्याला असे करायला कोणी भाग पाडले?, याचाही शोध घेतला पाहिजे. पोलीस खात्याने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता? : अजित पवार पुढे म्हणाले की, शरद पवारांना ज्या व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे त्यावर तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी याचा शोध घ्यावा. प्रत्येकाला संविधानाने व्यक्तिगत स्वातंत्र्य दिले असले तरी त्याचा गैरवापर का करायचा? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हे ही वाचा :