पुणे Yuva Sangharsh Yatra : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधलाय. या युवा संघर्ष यात्रेकडं दुर्लक्ष करता येणार नाही; अन्यथा तुम्हाला सत्तेवरून पायउतार व्हावं लागेल, असं शरद पवार यांनी सांगितलंय. ते आज पुण्यात युवा संघर्ष यात्रेत बोलत होते. युवा संघर्ष यात्रा प्रभावी ठरेल, त्यामुळं याकडं राजकीय पक्षाचं लक्ष असल्याचं देखील शरद पवार यांनी सांगितलंय.
संघर्ष यात्रा नव्या पिढीचा उपक्रम : राष्ट्रवीदीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला आज पुण्यातून सुरुवात झाली. यानिमित्त आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, 800 किलोमीटरचा प्रवास छोटा नाही, हा 42 ते 45 दिवसांचा प्रवास आहे. युवा संघर्ष यात्रा हा नव्या पिढीचा उपक्रम आहे. तरुणांना आत्मविश्वास देणारी ही संघर्ष यात्रा आहे. एवढंच नाही तर गावोगावी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या यात्रेचं महत्वाचं योगदान असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.
कंत्राटी भरतीचा निर्णय तातडीनं रद्द : युवा संघर्ष यात्रेची घोषणा होताच शासनानं कंत्राटी भरतीचा निर्णय तातडीनं रद्द केला. सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता टिकवायची असेल, तर या तरुणांकडं दुर्लक्ष करता येणार नाही. त्यासाठी ही संघर्ष यात्रा महत्त्वाची ठरणार असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय. आज राज्यात शाळा आहेत, पण शिक्षक नाहीत, शिक्षकांची रिक्त पदं भरलेली नाहीत. शैक्षणिक संस्था चालतात पण भरमसाठ फी आकारतात. शिक्षक, प्राध्यापकांची पदे भरण्यात यावीत.
बेरोजगारांच्या संख्येत वाढ : भरती एमपीएसच्या माध्यमातूनच करावी. संभाजीनगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती येथे आयटी क्षेत्राचा विकास व्हावा, अशी तरुणांची मागणी आहे. आज बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली आहे. या मागण्या आज युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं बैठक बोलावावी, मी या बैठकीला उपस्थित राहून कोणत्या मागण्या किती दिवसांत पूर्ण होतील यावर चर्चा करणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -