शिरुर (पुणे) - पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून तसेच वारंवार दमदाटी व जीवे मारून टाकण्याच्या धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तक्रारीनुसार, पीडित महिला ही शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे. पीडित महिला ही रांजणगाव एमआयडीसीतील एका खाजगी कंपनी मध्ये काम करत होती सन 2002 साली पीडित महिलेचा गावाकडील एका व्यक्ती सोबत पूर्वी लग्न झाले होते आणि पहिल्या नवर्यापासून तिला एक मुलगी आहे. पहिल्या पतीसोबत पीडित महिला ही दोन वर्ष राहिले त्यांचे नेहमी भांडण होत असल्यामुळे पहिल्या पतीपासून तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर रांजणगाव एमआयडीसीतील परिसरात ती राहण्यासाठी आली. एका खासगी कंपनीत काम करत असताना पीडित महिलेच्या गावाकडील अनिल राजेंद्र सुपेकर (रा. सुपेकरवाडी,कुळधरण, ता.कर्जत,जि. अहमदनगर) हा सदर कंपनीमध्ये काम करत होता. दरम्यान, अनिल याने पीडित महिलेचा मोबाईल नंबर एका अनोळखी व्यक्तीकडून घेतला. तसेच त्या क्रमांकावर तो वेळोवेळी फोन करू लागला. एके दिवशी आरोपी अनिल याने पीडित महिलेला फलके मळा येथील राहत असलेल्या खोलीवर बोलावले. त्या ठिकाणी पीडित महिला गेली असता, अनिल याचे कुटुंबीय कोणीच त्या ठिकाणी नव्हते, त्यामुळे महिलेने कुटुंबीयांची विचारणा केली असता आरोपी अनिल याने थेट लग्नाची मागणी केली.
दरम्यान, महिलेने 'याबाबत तुझ्या कुटुंबियांना माहिती आहे का? असे विचारले असता आरोपी अनिल याने 'मला तुझ्याशी लग्न करायचे आहे' असे त्याने सांगितले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आरोपी अनिल व पीडित महिला हे एकत्रित राहू लागले. दरम्यान अनिल याच्या शारीरिक संभोगाच्या मागणीचा विरोध पीडित महिला करत होती. मात्र अनिल लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत लैंगिक अत्याचार करून वेळोवेळी उपभोग घेत होता. त्याच दरम्यान पीडित महिलेला अनिल याच्यापासून दोन महिन्याचा गर्भ राहिला. गर्भ धारणा झाली असल्याची माहिती पीडित महिलेने अनिल याला दिल्यानंतर अनिल ने लवकरच लग्न करू असे सांगून महिलेचा गर्भपात केला. तसेच पीडित महिलेने वेळोवेळी लग्नाची मागणी करून सुद्धा आरोपी अनिल याने टाळाटाळ केली.
एके दिवशी आरोपी अनिल याने फलकेमळा येथून पळ काढला याच वेळेस त्याच्या जवळ असलेले पीडित महिलेचे गंठण व महाराष्ट्र बँकेचे एटीएम मधील पैसे असे एकूण अंदाजे 60 हजार रुपये तो घेऊन पसार झाला. त्यावेळी पीडित महिलेने संपर्क साधला असता आरोपी अनिल याने धमकी दिली तसेच आरोपीचे वडील व चुलते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही तीच वागणूक पीडितेला दिली. फोनवरून वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे तसेच 'तुला काय करायचं आहे ते तू कर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी येत राहिल्याने पीडितेने अखेर घडलेला प्रकार शिरुर पोलीस स्टेशनला सांगितला व पोलिसांनी या बाबत गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याबाबत आरोपी अनिल याला पोलिसांना अटक केली असून ३ जून पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण उंद्रे अधिक तपास करत आहेत.