पुणे - नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथे सिमेंट-विटा वाहतूक करणाऱ्या कंटेनर आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. मात्र, या घटनेत अन्य पाच वाहनांनाही अपघात झाला आहे. या विचित्र अपघातामध्ये सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच या अपघातामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राजगुरुनगर शहरालगत वाहतूक कोंडी...
राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गवर वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारी रात्रीदेखील नाशिकच्या दिशेने सिंमेंट विटा घेऊन जाणाऱ्या एका कंटेनर आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. मात्र, अचानक झालेल्या या अपघातामुळे दोन्ही वाहनांच्या मागून येणाऱ्या वाहने अनियंत्रित होऊन त्याही वाहनांचा अपघात झाला.
या अपघातामध्ये सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच कंटेनरमधील विटांचा खच रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर दोन्ही बाजुने वाहतुककोंडी निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातामधील जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
वाहतूक पोलिसांसमोर वाहतूककोंडी सोडविण्याचे आवाहन...
या विचित्र अपघातात सात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच महामार्गावर सिमेंट विटा पडल्याने वाहतूककोंडीही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम सुरू केले होते.