पुणे : राज्यात सध्या गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकांचे वातावरण आहे. कोणत्या निवडणुका कधी जाहीर होतील, यासाठी त्या त्या भागातील इच्छुकांकडून जोरदार तयारी केली जात आहे. असे राज्यातील चित्र असले तरी भोर तालुक्यात मात्र शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीची चर्चा आहे. या निवडणूकीची प्रक्रिया जाहीर झाली, उमेदवार जाहीर झाले. चिन्ह ही भेटले आणि निकाल देखील लागला. काय आहे ही प्रक्रिया सविस्तर पाहू या.
10 हजार मुलांचा सहभाग : भोर तालुक्यातील पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या संविधान शिक्षण उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील 274 शाळांमध्ये सन 2023 - 24 शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीची प्रक्रिया राबविण्यात आली. यात या 274 शाळांमधील 10 हजार मुलांनी सहभाग नोंदवला. आजपर्यंत देशात कोणत्याही राज्यात एवढे मतदान झाले नाही, असे 96 टक्के मतदान झाले आहे.
अशी राबविली निवडणूक प्रक्रिया : या शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उपक्रमात कश्या पद्धतीने निवडणूक प्रकिया राबविली जाते, त्याचप्रमाणे ही प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्यातील 274 शाळांनी सहभाग नोंदविला होता. तर यात 10 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या 274 शाळांमध्ये तब्बल 2770 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 136 अर्ज ही बाद झाले आहे. 2637 अर्ज हे वैद्य ठरविण्यात आले होते. विशेष म्हणजे निवडणूक आचारसंहिता भंग केल्याने 1 उमेदवाराचे नामनिर्देश रद्द करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुलांनी या उपक्रमात उत्साह दाखवत तब्बल 96 टक्के मतदान केले आहे.
का राबविली गेली निवडणूक प्रक्रिया : येत्या 26 जानेवारी रोजी आपण 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. तरीही प्रजासत्ताक देश म्हणजे नक्की काय ? हे भारतातील किती नागरिकांना निश्चित सांगता येते, याचा शोध नीटपणे आजवर कुणीही घेतलेला नाही. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, परंतु संविधानाने आपणास दिलेला स्वातंत्र्याचा अधिकार बहुतांश नागरिकांना नीट सांगता येत नाही. आपण महिला दिन साजरा करतो, परंतु महिलांसाठी संविधानात असलेल्या विशेष तरतुदी व कायदे किती महिलांना माहीत आहेत ? भारतातील नागरिकांमध्ये असलेल्या या अज्ञानाचे मुख्य कारण म्हणजे त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी उपयुक्त असलेले संविधान शिक्षण आजवर औपचारिक शालेय शिक्षणातून देण्यात आलेले नाही. ही बाब लक्षात घेऊन जबाबदार व संवेदनशील नागरिक घडवण्यासाठी भोर तालुक्यातील 274 शाळांमध्ये संविधान शिक्षण उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत जानेवारी महिन्यातील घटक शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया राबवणे असा आहे. प्रजासत्ताक भारत म्हणजे काय? संविधानाने देशाची सत्ता प्रजेच्या हाती सोपवली आहे ती कशी? लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी संविधानाने जनतेला दिलेला मताधिकार व नकाराधिकार, निवडणूक प्रक्रियेतील आचारसंहिता, नामनिर्देशन पत्र, माघार, पाठिंबा, बिनविरोध निवड, मतपत्रिका, मतदान, मतमोजणी अशा महत्वपूर्ण बाबींचे आज शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे आणि या विद्यार्थ्यांमधून देशाचे भावी दृष्टे व विवेकी नेतृत्व विकसित व्हावे, यासाठी भोर तालुक्यातील 274 जिल्हा परिषद शाळांमध्ये 10 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया राबवली गेली आहे. यात 19 जानेवारी रोजी मतदान व 20 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली आहे.
शाळेचे विद्यार्थी करणार प्रतिनिधित्व : थोडक्यात प्रजासत्ताक देश म्हणजे नक्की काय व देशाची अंतिम सत्ता प्रजेच्या हाती कशी सोपवली आहे, याचे शिक्षण विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून स्वानुभवातून घेतले आहे. भोर तालुक्यातील जवळपास 10,000 विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा खरा प्रजासत्ताक दिन साजरा झाला आहे. यातून भारतातील लोकशाही बळकट होण्यासोबतच देशाचे भावी नेतृत्व घडवले जाणार आहे. शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत निवडून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती शाळेची सत्ता, कारभार सोपवला जाणार आहे. एकंदरीत संविधान शिक्षण हा उपक्रम एका दिवसाचा उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून भारतीय संविधानसभेला अपेक्षित असलेला संवैधानिक मूल्यांनी युक्त असलेला संविधान साक्षर समाज घडवण्यासाठीचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. तसेच या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत शाळेतील पटसंख्येनुसार निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. यात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांमध्येच मुख्यमंत्री तसेच विविध खाती वाटप होणार आहे. शाळेतील स्वच्छता तसेच शाळेतील विविध उपक्रम आणि शाळेतील शिक्षण यात हे विद्यार्थी प्रतिनिधित्व करणार आहे.
निवडणुक झाली चुरशीची : जिल्हा परिषदेच्या या शाळांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुका काहीशा राजकीय निवडणुकांप्रमाणे चुरशीच्या पाहायला मिळाल्या. 1 मताने उमेदवार विजयी, शेवटच्या चिठ्ठी पर्यंत चुरशीची लढत, तर मित्रासाठी उमेदवाराकडून स्वतःला मतदान न करता मित्राला मतदान करने, निवडणुकीत दोस्तीत कुस्ती, काही उमेदवारांना तर 0 मतदान आणि विशेष म्हणजे या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत देखील विद्यार्थ्यांकडून नोटांना झालेले मतदान आणि मतदान झाल्यावर फटाके फोडून, गुलाल उडवून विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला.