पुणे - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी 'न भूतो न भविष्यति' असे काम केले आणि संपूर्ण देशाला एकत्र करून एक आदर्श निर्माण केला, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.
सावरकरांनी स्वतः प्रचंड त्रास सहन केला -
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गिरीश बापट यांनी आज (शुक्रवारी) सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी बोलताना गिरीश बापट म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी विनायक दामोदर सावरकर या क्रांतीकारकांने न भूतो न भविष्यती असे काम केले. आणि संपूर्ण देशाला एकत्र करून एक आदर्श निर्माण केला. स्वतः प्रचंड त्रास सहन करून त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. त्यांचा कारावास जगात प्रसिद्ध आहे. स्वतः हाल अपेष्टा सहन करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
भारत मातेचा थोर सुपुत्र कायमच आदर्श -
पुढे बोलताना बापट म्हणाले, सावरकरांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. ते लेखक होते, कवी होते, भाषा सुधारक देखील होते. याशिवाय ते विज्ञानवादी देखील होते. दोन शब्दात दोन संस्कृती हा त्यांचा जुना लेख आजही अजरामर आहे. भावनेच्या आहारी न जाता ते विज्ञानवादी दृष्टी ठेवून काम करणारे होते. भारत मातेचा थोर सुपुत्र कायमच आदर्श राहील.