पुणे - मुलींवर संस्कार नसल्यानेच बलात्काराच्या घटनात वाढ होत असल्याचे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेन्द्र सिंह यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या विधानाचा समाचार घेतला असून खऱ्या संस्काराची गरज भाजपच्या नेत्यांना असल्याचे सांगितले.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, भाजपच्या नेत्यांनी केलेले हे विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. या विधानातून महिलांच्या संस्कारावर बोट ठेवले गेले असून महिलांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे विचार मनोरुग्ण प्रवृत्तीचे विचार आहेत. स्वतःवर अत्याचार व्हावा म्हणून कोणतीही मुलगी पुढे जात नाही. त्यामुळे जितकी संस्काराची गरज मुलीवर आहे त्याहीपेक्षा काकणभर अधिक संस्कार पुरुषांवर झाले पाहिजेत. भाजप नेत्यांची ही अशी वक्तव्ये पाहता खऱ्या संस्काराची गरज त्यांनाच असल्याचे दिसून येते. लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी संसदेमध्ये लोकांचे प्रश्न मांडावेत त्यांना सुरक्षितता कशी देता येईल याविषयीचे प्रश्न मांडावेत. पण, ज्यावेळी अशा प्रकारची बेताल वक्तव्य ही नेते मंडळी करतात तेव्हा त्यांच्या डोक्यात मेंदू आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. महिलांना दुय्यम लेखन, त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देणे, त्यांच्यावर हीन दर्जाची टीका करण्याची भाजपची ही प्रवृत्ती समाजात पसरत आहे. भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्याने समाजात गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. ज्या पीडितेला आपण न्याय देणार आहोत, तिची बाजू मांडताना आपण काय उपाययोजना करू शकतो याबद्दल बोलण्यापेक्षा ही लोक अशा प्रकारची बेताल वक्तव्य करतात. अशाप्रकारची बेताल वक्तव्य करणारे हे देखील आरोपी इतकेच दोषी आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी यावेळी केली.
हेही वाचा - शिरूरमध्ये आमदार अशोक पवारांच्या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन