पुणे - मागील ५ वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले. महिला धोरणांच्या बाबतीत भाजपने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. त्यावेळेस सुरू असलेल्या दक्षता कमिटीही त्यांनी बंद पाडल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. त्यामुळे महिलांना सुरक्षा मिळाली नसल्याचे त्या म्हणाल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चाकणकर बोलत होत्या.
समाज ज्या दृष्टीकोनातून महिलेला पाहात आहे. त्याचे प्रबोधन होणे फार गरजेचे आहे. बाजारपणाची वृत्ती समाजामध्ये वाढली आहे. प्रत्येक स्त्रीला वस्तू म्हणून पाहिलं जात आहे. ही विकृती खालच्या पातळीला घेऊन जाणारी असल्याचे चाकणकर म्हणाल्या. महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचे हैदराबादच्या पार्श्वभूमीवर एनकाऊन्टर व्हावं असे मी म्हणणार नाही, मात्र कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी असल्याचे चाकणकर म्हणाल्या.
हेही वाचा - फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसेंचाही फोन टॅप?
हेही वाचा - 'काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक सारखे प्रश्न सुटले नसते'
एक महिला म्हणून वाटते, की जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी. काल पीडित मुलीला आणि तिच्या आईला भेटल्यानंतर अंगावर शहारे यावेत एवढी भयानक स्थिती होती. महिला, युवती, महाविद्यालयीन विद्यार्थीनींवर अत्याचार अन्याय होतील, त्याठिकाणी समुपदेशाबरोबर तत्काळ मदत देण्याचे धोरण अवलंबत असल्याचे त्या म्हणाल्या.
यवतमाळ, नागपूर, औरंगबाद आणि पनवेल येथे घडलेली घटनेच्या संदर्भातील आरोपींचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी असे त्या म्हणाल्या. गेल्या ५ वर्षांमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये बलात्कार आणि अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये पहिल्या क्रमांवर राहिला असून, हे दुर्दैव असल्याचे चाकणकर म्हणाल्या.