पुणे (मंचर) Robbers Arrested In Manchar : पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये वैभव बाळू रोकडे (वय २४ रा. नागाचा खडा, ता.मुरमाड, जि.ठाणे), गणेश रामचंद्र टोके (वय २६, रा. नडे, ता. मुरमाड, जि. ठाणे), अजय घिसे (वय २३, चालक, रा. कलगाव, ता. शहापूर, जि. ठाणे), ग्यानसिंग वर्मा (वय २३, रा. घोडबंदर रस्ता, ठाणे, मूळ गाव गायत्रीनगर बांधा उत्तरप्रदेश), मोहम्मद दर्जी (वय २३, रा. नेहरू चाळ, कुर्ला, पूर्व मुंबई, मूळ रा. सुलतानपूर उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या दोन टीम इतर दोन दरोडेखोरांच्या शोधात रवाना केल्या असल्याची माहिती खेड पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली.
अवघ्या पाच मिनिटांत पोहोचले पोलीस : पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंचर येथील उत्तमभाग्य ज्वेलर्सवर बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. एकूण सात जणांनी मिळून दुकानात प्रवेश केला. चोरी करण्याच्या हेतूनं सोने-चांदीचे दागिने बॅगमध्ये भरण्यास सुरुवात केली; परंतु अवघ्या पाच मिनिटांत पोलीस आले अन् दरोडा उघडकीस आला.
पोलिसांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले : सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्यानंतर चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उत्तमभाग्य ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटे तीन वाजता सात जण घुसले. त्यांनी हत्यारांचा वापर करत शटर उघडून दुकानात प्रवेश केला. या घटनेची कुणकुण शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागली आणि त्यांनी त्वरित पोलिसांना फोन केला. दरम्यान, पोलिसांना फोन आल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले. मात्र, दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. दरोडेखोरांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याकडून कोयते, गॅस कटर आणि इतर हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.
दरोडेखोरांनी यापूर्वीही दरोडे टाकल्याची शक्यता : या घटनेत दोघे जण पळून गेले. त्यांच्या शोधासाठी टीम रवाना झाली आहे. दरम्यान या टोळीतील दरोडेखोर अट्टल आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केली. दरोडेखोरांकडून आणखी काही माहिती मिळते का? याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. सणासुदीच्या दिवसात ज्वेलर्सवर दरोडा घालण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही राज्यातील अनेक शहरात दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दुकानावर भरदिवसाही दरोडा टाकला आहे. यात दुकान मालकाला कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.
हेही वाचा: