पुणे - गेल्या दोन दिवसांपासुन भीमाशंकर परिसराला अतिवृष्टीने झोडपले आहे. सततच्या धो-धो मुसळधार पावसाने भिमाशंकर परिसरातील भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील धरणाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर भीमाशंकर परिसरासह तालुक्यात मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील भीमाशंकर भोरगिरी परिसरात 350 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेली चार पाच दिवस पडणाऱ्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी भात रोपे उपटून त्याची आवणी (लावणी) केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे भोरगिरी परिसरातील भात खाचरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात खाचरे फुटून लावणी केलेल्या भात रोपे गाडली गेली आहेत. काल दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे भात आवणी केलेले भात पीक वाहून गेले.
भिवेगाव, भोमाळे, टोकावडे, मंदोशी, मोरोशी, खरपूड, कुडे, नायफड, भोरगिरी, कारकुडी, धामणगाव खुर्द, शिरगाव या गावांच्या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील तीन धरणांपैकी कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारे भामा आसखेड धरण क्षेत्रात आंबोली परिसरात अतिवृष्टी झाल्याने भामा आसखेड धरणाच्या पाण्यातही वाढ झाली आहे.
हेही वाचा - राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस धोक्याचे