पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत सततच्या पावसामुळे राखीव दिवशी सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या रत्नागिरी जेट्स संघाला विजेता घोषित करण्यात आले. रत्नागिरीचे + 0.630 नेट रनरेटसह 8 गुण होते.
काल पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर काल पावसामुळे अंतिम सामन्याचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे आज सकाळी सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून कोल्हापूर टस्कर्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. कोल्हापूरचे आघाडीचे फलदांज अंकित बावणे (1), साहिल औताडे (5) हे स्वस्तात बाद झाले. रत्नागिरीचा डावखुरा फिरकीपटू कुणाल थोरातने या दोघांना बाद करून कोल्हापूर संघाला 3.2 षटकात 2 बाद 12 धावा असे अडचणीत आणले.
रत्नागिरीची घातक गोलंदाजी : कोल्हापूरची धावसंख्या 7 षटकात 2 बाद 43 धावा असताना पाऊस पुन्हा सुरु झाला. एकाबाजूने केदार जाधवने संघाची धुरा सांभाळली असताना मात्र दुसऱ्या बाजूने नौशाद शेख (12), सिद्धार्थ म्हात्रे (0), अक्षय दरेकर (4) हे झटपट बाद झाले. कोल्हापूरची 10.2 षटकात 5 बाद 57 अशी अवस्था झाली. केदार जाधव 28 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांसह 32 धावांवर असताना रत्नागिरीच्या विजय पावलेने त्याला त्रिफळाचीत केले.
रत्नागिरीला गुणतालिकेतील अव्वल स्थानाचा फायदा : होता त्यानंतर कोल्हापूर संघाची विकेट गळती सुरूच राहिली. निखिल मदास (8), मनोज यादव (2) हे एकेरी धावसंख्येवर बाद झाले. रत्नागिरी जेट्स संघाकडून प्रदीप दाढे (3-24), कुणाल थोरात (2-22), निकित धुमाळ (2-12) आणि विजय पावले (1-8) यांनी सुरेख गोलंदाजी केली. कोल्हापूर संघाची 16 षटकांत 8 बाद 80 धावसंख्या असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. सतत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या रत्नागिरी जेट्स संघाला विजेता घोषित करण्यात आले.
विजेत्या संघाला 50 लाख रुपये मिळाले : विजेत्या रत्नागिरी जेट्स संघाला करंडक व 50 लाख रुपये, तर उपविजेत्या कोल्हापूर टस्कर्स संघाला करंडक व 25 लाख रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमसीएचे उपाध्यक्ष किरण सामंत, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळ्ये, सचिव शुभेंद्र भांडारकर, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि जान्हवी धारिवाल बालन व रत्नागिरी संघाचे मालक राकेश व राजन नवानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी सर्व संघ मालक, खेळाडू, एमसीए अपेक्स सदस्य, ग्राउंड स्टाफ, सर्व प्रेक्षकांचे आभार मानले.
स्पर्धेतील इतर पारितोषिके :
- सर्वोत्कृष्ट फलंदाज - अंकित बावणे - 363 धावा
- सर्वोत्कृष्ट गोलंदाज - सचिन भोसले - 14 विकेट
हेही वाचा :