पुणे Rare Rice Conservation : खेड, भोर, मावळ हे तांदळाचं आगार म्हणून ओळखलं जातं. आपल्या देशात भाताचे जवळपास दोन लाखांहून अधिक वाण विविध भागात आढळतात. मात्र काळाप्रमाणं भाताचं वाण देखील संपुष्टात येऊ लागले आहेत. आता अवघे 150 ते 200 वाणच शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यात खेड तालुक्यातील सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीमध्ये तब्बल 88 वाणांचं संवर्धन केलं जात आहे. तसंच त्याची जनजागृती देखील केली जात आहे.
दुर्मीळ भाताच्या वाणांचं संवर्धन : आपल्या देशात प्रत्येक प्रदेशात गरजेनुसार भाताचं वाण विकसित झालं होतं. यामध्ये हाडाच्या मजबुतीसाठी, थंडीसाठी, उन्हाळ्यात खाण्यासाठी, अँटी डायबेटिस, अँटी कॅन्सर असे प्रचंड औषधी गुणधर्म असलेले, तर काही भात ज्यामध्ये प्रचंड पोषणमूल्य असल्यानं केवळ राजे-महाराजे आणि सैनिकांना खाण्यासाठी राखीव ठेवलेले भाताचे वाणं आपल्या देशात होते. यापैकी लाखो भाताची वाणं नामशेष झाली आहेत. त्यापैकी दीडशे-दोनशे वाणं शिल्लक आहेत. या वाणांचं संवर्धन आणि वाढवण्यासाठी सह्याद्री स्कूल प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांत निसर्गाचा लहरीपणा, संकरित भाताच्या बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, खतांचा तुटवडा आणि मजुरीचा खर्च, यामुळे भातशेती नकोशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीत या दुर्मीळ भाताच्या वाणांचं संवर्धन केलं जात आहे.
संकरित वाण टिकाव धरू शकत नाही : सध्या निसर्गाचा लहरीपणा, अचानक अधिक पाऊस, कमी पाऊस पडण्यानं शेतीवर आणि पिकांवर प्रचंड परिणाम झाला आहे. याशिवाय अचानक एकाच वेळी मोठ्या रोगराईला देखील पिकं बळी पडत आहेत. यामध्ये कृषी विद्यापीठ, कंपन्यांनी तयार केलेलं संकरित वाण टिकाव धरू शकत नाही. यासाठीच आपले देशी आणि पारंपरिक वाणंच अशा परिस्थितीत टिकू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यानं येणाऱ्या संकटात वाण टिकून राहण्यासाठी ही वाणं मदत करू शकतात. यामुळेच प्रत्येक शेतकऱ्यानं किमान एक वाण दत्तक घेऊन आपल्या शेतात संवर्धन आणि वाढ करावी.
सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीत संवर्धन : खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीत अशा अनेक पारंपरिक आणि देशी पिकांच्या विविध वाणांचं संवर्धन केलं जात आहे. आपल्या देशातील स्थानिक, पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक आणि देशी वाणांचा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सह्याद्री स्कूलच्या वतीनं पुढाकार घेण्यात येतो. खेड तालुक्यातील कृष्णमूर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूलच्या वतीनं शिक्षण क्षेत्रासोबतच स्थानिक शेतकऱ्यांसोबत नैसर्गिक शेतीचं देखील काम केलं जातं. सह्याद्री स्कूल देशी बियाणं संवर्धक आणि समन्वयक दीपा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून इथं नैसर्गिक शेती केली जाते. तब्बल 65 एकर परिसरात ही निवासी शाळा असून, इथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पौष्टिक, शुद्ध आणि विषमुक्त अन्न मिळावं, म्हणून शाळेच्या परिसरातच मोठ्याप्रमाणात नैसर्गिक शेतीचे अनेक प्रयोग केले जातात. त्यामुळे हे नैसर्गिक वाण जतन करणं तितकंच गरजेचं आहे.
हेही वाचा :