पुणे Ram Mandir Karsevak : देशभरात अयोध्येतील राम मंदिराचा उत्साह सुरु असून मंगळवारपासून मुख्य पुजेला सुरुवात झालीय. ही पूजा 22 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु या सगळ्यांची सुरुवात म्हणजे राम मंदिराच्या आंदोलनाला केलेली कारसेवा आहे. या कारसेवेमध्ये हजारो कारसेवक सहभागी झाले होते. त्यावेळेस ची परिस्थिती पाहता, "सेवकांवर गोळ्या घातल्या शरयू नदीमध्ये प्रेतांचा खच पडला. तरी आम्ही डगमगलो नाही आमच्या इच्छाशक्तीनं ती चळवळ पूर्ण झाली". त्याचं श्रेय म्हणजे आज राम मंदिर पूर्ण होण्यात दिसत असल्याची भावना पुण्यातील कारसेवकांनी व्यक्त केलीय.
कारसेवकांच्या भावना काय : राम मंदिर पूर्णतेवर आपल्या भावना व्यक्त करताना कारसेवक प्रमोद पाचपोर म्हणाले की, "आज पूर्ण भारताच्या अस्मितेचं जागरण याठिकाणी होतं. त्याच अस्मितेचं प्रतीक म्हणून प्रत्यक्ष रामाची तिथं प्रतिष्ठापनाही होते. ही देशाच्या इतिहासातील एक सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली घटना आहे. त्यामुळं अशा या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत. प्रत्यक्ष त्याठिकाणी कारसेवेच्या माध्यमातून तिथं काम झालंय. त्याचा अत्यानंद आम्हाला होतोय. अशा या आनंदोत्साहात आपण प्रत्यक्ष सहभागी होतोय. त्याच्यामुळं एक चैतन्य निर्माण झालंय, असं आपल्याला म्हणता येईल."
100 किमी पायी चाललो : त्यावेळचे अनुभव सांगताना कारसेवक प्रमोद पाचपोर सांगितलं की, "पहिली कारसेवा 1990 साली झाली. त्याठिकाणी संपूर्ण बंदोबस्त होता. मुलायम सिंह यांनी 'परिंदा भीं पैर नही रख सकता', असं म्हटलं होतं. तिथं मोठा बंदोबस्त होता. परंतु, उत्साह आणि प्रचंड दुर्दम्य आत्मविश्वासामुळं अनेक जण त्याठिकाणी पोहोचले. मात्र काही कारसेवक तिथं पोहोचले नाहीत. आम्हीही पोहोचलो नाही. अलाहाबादपासून पुढं आम्हाला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर जंगलामध्ये सोडून दिल. पुढं आम्ही जवळजवळ 100 किलोमीटर पायी चालत गेलो. पण शेवटपर्यंत तिथं पोहोचलो नाही."
शरयू नदीत प्रेतांचा खच पडला : पुढं बोलताना प्रमोद पाचपोर म्हणाले, "जे कारसेवक ठिकाणी पोहचेले त्यातील कोठारी बंधूंनी त्याठिकाणी घुमटावर भगवा ध्वज उभारला. एक प्रकारे कारसेवा यशस्वी झाली. त्यामुळं अनेक ठिकाणी त्या कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. शरयू नदीमध्ये प्रेतांचा खच पडलेला होता. अशा परिस्थितीत आत्मविश्वास न डगमगता अनेक कारसेवक पुढं गेले. त्यांनी त्याठिकाणी आपले प्राणार्पण केले. या पहिल्या कार सेवेत अनेक कारसेवक आपल्या प्राणाला मुकले होते. अशा वातावरणात पुन्हा 1992 साली दुसरी कारसेवा झाली. त्यावेळी सरकार बदललेलं होतं. कल्याण सिंहाच सरकार होतं. त्यामुळं आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कारसेवेत प्रत्यक्ष सहभाग घेउन तो घुमट पाडण्याचं श्रेय हे सगळ्या कारसेवकांना मिळालं. अत्यंत कमी काळात पाच हजार स्क्वेअर फुटांचं बांधकाम नेस्तनाबुत झालं. त्याठिकाणी रामाचं मंदिर उभं राहिलं, याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे."
राम मंदिर होताना पाहून अश्रू अनावर : राम मंदिरावरुन भावनिक होत कारसेवक प्रदीप फासे त्यावेळचे अनुभव सांगताना म्हणाले की, "पुण्यामधून त्यावेळी साडेतीन हजार कारसेवक गेले होते. त्यांना जाताना रेल्वेचं बुकिंग मिळालं नाही. मध्येच कुठेतरी उतरवून द्यायचे. उतरल्यानंतर आपल्याला कुठून जायचं हा रस्तासुद्धा माहीत नव्हता. तरीही तिथल्या जनतेनं आमची राहायची आणि जेवणाची कित्येकवेळी व्यवस्था केली. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याठिकाणी खूप थंडी असते. शारीरिक, आर्थिक अशा सगळ्या अडचणी होत्या. परत येताना सुद्धा खूप अडचणी आल्या. कारसेवकांचे नाव लिहून घ्यायचे, कित्येक ठिकाणी फोटो काढून घ्यायचे. आम्ही परत आल्यानंतर मुख्य रेल्वे स्टेशनला न उतरता अगोदरच्या रेल्वे स्टेशनवर उतरलो होतो. हे सगळं होत असताना राम मंदिर होणार का? हा सुद्धा प्रश्न होता. मात्र आज राम मंदिर होत आहे. याचा खूप आनंद असून अश्रू अनावर होत आहेत."
'मंदिर वही बनाना है' असा संकल्प करुन कारसेवक आयोध्येकडे : आपल्या आठवणींना उजाळा देताना कारसेवक योगेश थत्ते म्हणाले की, "राम नाम की ओढ के चादर, हमे आयोध्या जाना है, मर जाना है, मिट जाना है मंदिर वही बनाना है' असा संकल्प करुन 90 च्या साली सगळे कारसेवक अयोध्याकडे रवाना झाले होते. सतना स्टेशनवर आम्हाला उतरवण्यात आलं. तिथून आम्हाला चित्रकूट नेण्यात आलं. उमा भारतीच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारनं आम्हाला अटक केलं. तिथून परत आम्हाला मध्य प्रदेशात सोडून देण्यात आलं. आम्ही अयोध्याकडे निघालो तर त्याठिकाणी आम्हाला नैनीजे मध्ये काही वेळ ठेवण्यात आलं. तोपर्यंत कारसेवा झाली होती. पहिल्या कारसेवेत आम्हाला अयोध्येच्या सीमेपर्यंतही जाता आलं नाही. त्यानंतर 92 च्या वेळेस आम्ही या सगळ्या पराभवाचा वचपा काढला."
मुलायम सरकारच्या काळात आम्ही लॉकडाऊन : पुढं बोलताना योगेश थत्ते यांनी सांगितलं की, "6 डिसेंबर 1992 ला प्रत्यक्ष ही घटना घडली. पाच डिसेंबरला विवंचनेत होतो. ती रात्र प्रचंड तणावात गेली. उद्या काय होणार हे कुणालाच माहीत नव्हतं. भारतीय हिंदू समाजाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम ज्या घटनेनं झालं त्या घटनेचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. लॉकडाऊन आता अनेकांनी दोन वर्षांपूर्वी अनुभवलं. पण, आम्ही मुलायम सिंह सरकारच्या काळात 90 च्या वेळी लॉकडाऊन झालो होतो."
हेही वाचा :