पुणे - महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र निंबाळकर यांना सोमवारी महापालिकेत महापौरांच्या दालनात नगरसेवकांकडून शिवीगाळ करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना मारहाण केली होती.
पुणे शहरातील जलपर्णी काढण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात सोमवारी आंदोलन केले होते. यावेळी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे महापौरांच्या दालनात आले होते. यावेळी महापौर देखील उपस्थित होत्या. मात्र, अतिरिक्त आयुक्त यांच्या उत्तराने नगरसेवकांचे समाधान झाले नाही. यावेळी नगरसेवक तसेच राजेंद्र निंबाळकर यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना मरहाण केली होती.
हा सगळा प्रकार घडल्यानंतर सायंकाळी महापालिकेकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार नगरसेवक अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी महापालिकेच्या प्रांगणात आंदोलन करणार आहेत.