पुणे - शहरानजीक असलेल्या सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या घाट रस्त्यात दरड कोसळली आहे. रस्त्यावरील दरड काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस किल्ला बंद ठेवण्यात आला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या १० दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, सिंहगड आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. याच दरम्यान पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यात शुक्रवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे प्रशासनाकडून ही दरड काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, पर्यटक शनिवारी आणि रविवारी या किल्ल्यावर गर्दी करत असतात. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होऊ नये. तसेच दरड हटवण्याच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी घाट रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.