पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवालाविषयी प्रश्न विचारतात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उत्तर न देताच पत्रकार परिषद सोडून निघून गेले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे आधीच पुणे पोलिसांवर चहुबाजूंनी टीका होत आहेत. पोलीस दबावाखाली असून योग्यरीत्या तपास करत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही याप्रकरणाबाबत बोलणे टाळले. त्यामुळे याप्रकरणात पुणे पोलीस नेमके काय लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण ?
पूजाने सात फेब्रुवारीला वानवडी येथील राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, पूजासोबत राहणाऱ्या अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात जोडले गेले. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले.
हेही वाचा - पूजा चव्हाणच्या मृत्यूचा सविस्तर अहवाल पोलिसांच्या हाती
सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. हा प्रकार घडल्यानंतर आतापर्यंत पोलिसांनी नेमका तपास काय केला? असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मोडी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक दिपक लगड यांना धारेवर धरले होते. तसेच याप्रकरणी तपास करू नये, यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तपास अधिकारी दिपक लगड यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. तसेच चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील भेट घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती.