पुणे - शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. या रुग्णांमध्ये अनेक रुग्णांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता भासते. मात्र, उपचार मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. याचा फटका पुण्यातील एका पत्रकाराला देखील बसला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीचे पुण्यात प्रतिनिधी असलेले पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पांडुरंग रायकर यांना योग्य वेळी व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
42 वर्षीय पांडुरंग यांनी यापूर्वी ईटीव्ही मराठी वाहिनीतही काम केले आहे. पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर 27 ऑगस्टला त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र, तिथेही त्रास सुरू होता. त्यामुळे त्यांची कोपरगावमधे अँटीजेन टेस्ट करण्यात आली, जी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर रविवारी 30 ऑगस्टला रात्री त्यांना उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आले. पुण्यातील पत्रकार मित्रांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो कोविड रुग्णालयात दाखल केले.
जंबो रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळे त्यांना दुसऱया एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी कार्डिॲक रुग्णवाहिकीचे गरज होती. ती मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते. मंगळवारी रात्री एक रुग्णवाहिका जंबो रुग्णालयात पोहचली. मात्र, त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, दुसऱ्या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा-सव्वाबारा वाजले होते. पुन्हा पहाटे चार वाजता रुग्णवाहिका मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला. पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकून पहाटे पाच वाजता रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. आयसीयूमधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत, असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो रुग्णालयात पोहचले. त्यावेळी डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचे सांगितले.
दरम्यान, थोड्याच वेळात कार्डिॲक रुग्णवाहिका जंबो रुग्णालयात पोहचली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. एकंदरीतच पुण्यासारख्या शहरात एका कोरोना योद्धा पत्रकाराला उपचारासाठी योग्य रुग्णालय उपलब्ध न होणे, व्हेंटिलेटर बेड न मिळणे आणि कार्डिॲक रुग्णवाहिका न मिळणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.