पुणे : कोणत्याही अनोळखी व्यक्तीला मदत करताना आता नीट विचार करण्याची गरज आहे. त्या व्यक्तीला खरेच आपल्या मदतीची गरज आहे का, हे पाहणे आता जरूरीचे झाले आहे. कारण पुण्यात अशीच एक विनयभंगाची विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आजारी असल्याचा बहाणा करून त्याला दुचाकीवरून दवाखान्यात सोडण्याचा मुलींना आग्रह करत त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. या नराधमाच्या मुसक्या चतु:शृंगी पोलिसांनी आवळल्या आहेत. अनुप वाणी (वय वर्ष 44 राहणार शनिवार पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तांत्रिक तपास करून आरोपीला शनिवार पेठेतून अटक केलेली आहे. आरोपीची चौकशी केली असता, त्याने असे अनेक प्रकारचे गुन्हे केल्याचे आम्हाला समजले आहे.- वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे
'अशी' घडली घटना : 6 जुलै रोजी रात्री 10 वाजता तक्रारदार तरुणी व तिची मैत्रिण पुण्यातील सेनापती बापट रोडने बालभारती इमारती समोरुन सायकल घेऊन पायी जात असताना एक जण दुचाकीवरुन आला. मला चक्कर येत आहे. तुम्ही माझ्याच दुचाकीवरुन मला पुढे सोडा, असे त्याने सांगितले. तेव्हा माणुसकीच्या नात्याने त्या तरुणीने त्यास मदत करण्यासाठी त्याची गाडी घेतली. तो पाठीमागे बसला होता. काही अंतरावर गेल्यावर त्याने तरुणीच्या अंगाला स्पर्श करण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला खूप वेळा सांगितले तरीही त्याचा स्पर्श वाढत होता. तिला भिती वाटल्याने तिने गाडी थांबवून मुलांची मदत मागितली. तोपर्यंत तक्रारदार तरुणीची मैत्रीण सायकलवरुन तेथे आली. तो गाडी घेऊन पळून गेला. दरम्यान त्या तरुणींनी ट्विटवरवर घडलेल्या घटनेची माहिती टाकली. पुणे पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत कुठलाही पुरावा नसताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून व दुचाकीच्या क्रमांकावरुन आरोपीला अटक केली.
17 ते 18 मुलींचा विनयभंग : मी आजारी आहे. मला गाडी चालवता येत नाही, असे म्हणून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींची हा व्यक्ती मदत मागत होता. मला जवळच्या दवाखान्यात सोडा असे म्हणत त्या तरुणींना दुचाकी चालवायला देत असे. गाडी चालवायला देऊन पाठीमागे बसून तो तरूणींशी अश्लिल चाळे करत विनयभंग करत होता. पुण्यात अशा घटना सातत्याने होत आहे. आतापर्यंत या आरोपीने 17 ते 18 मुलींचा विनयभंग केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पाच ते सात लोकांनी त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.
मुलींची छेड करण्याचा प्रयत्न : याविषयी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले की, पुणे पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात आली होती. त्या हेल्पलाईनचा नंबर प्रसार माध्यमांद्वारे वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवरून करण्यात आला होता. दहा तारखेला ही हेल्पलाइन प्रसिद्ध झाली होती. अकरा तारखेलाच हेल्पलाईनवरून चतु:शृंगी पोलिसांकडे तक्रार आली होती. एसबी रोडला दोन मुली रस्त्याने जात असताना त्यांना एका व्यक्तीने अडवले. मला चक्कर येते, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडा, असा लिफ्टचा बहाना त्याने केला होता. गाडीवर बसल्यावर त्या मुलींची छेड करण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला होता.
हेही वाचा :