पुणे- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरातील कोंढवा भागातील सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला की, पुन्हा तितक्याच ताकदीने आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिलांनी दिली आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या धर्तीवर पुण्यातही दोन ठिकाणी वर उल्लेख केलेल्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर आंदोलकांची संख्या कमी केली गेली. मात्र, कलम १४४ लागू झाल्यावर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आरोग्याचा प्रश्न बघता आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोंढवा पोलिसांनी शाहीनबागच्या धर्तीवर सुरू असलेले कोंढव्यातील आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मागील एक आठवड्यापासून हे आंदोलन बंद असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा- covid19: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी; पोलीस आल्यावर गर्दी नियंत्रित