पुणे - जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. पुणे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात covid-19 गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने covid-19 वर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे साहजिकच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत असते. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळण्याच्या दृष्टीने काम करण्याला प्राधान्य असणार आहे, असे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची गडचिरोलीला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अभिनव देशमुख यांनी रविवारी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत ही माहिती दिली.
यावेळी देशमुख म्हणाले, की महिलांविषयक अत्याचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही. त्यातील आरोपींना लवकर अटक करणे, त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करणे आणि आरोपीला शिक्षा मिळवून देण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी प्राधान्य राहील. वाढत्या शहरीकरणासोबतच वाढत जाणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. सुरवातीच्या काळात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील अधिकाधिक गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यावर भर राहणार असल्याचेही अभिनव देशमुख यांनी सांगितले.