पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार भागात खरीप हंगामाचे मुख्य पीक असलेला बटाटा सध्याच्या संततधार पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे संकटात सापडले आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातगाव पठारावर खरीप हंगामात ७५० एकर बटाटा पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे उगवून आलेला बटाटा पिवळा पडायला सुरुवात झाली आहे. बटाटा उगाल्यानंतर बटाट्याच्या रोपांना सुर्यकिरणांची गरज असते. मात्र, सध्या ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरण मिळत नसल्याने बटाट्यांच्या रोपांवर रोगराई पसरत असून तणाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे बटाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून उत्पन्नावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दुष्काळी संकटातून सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या भांडवली खर्चाची गुंतवणूक करत बटाट्याची लागवड केली आहे. मात्र, सध्याचे पावसाचे प्रमाण व वातावरणातील बदल यामुळे खरीप हंगामातील बटाटा संकटात आला आहे.