पिंपरी चिंचवड (पुणे) - पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची सूत्रे हातात घेतल्यापासून अवैद्य धंद्यांना चाप लावण्यास सुरुवात केली आहे. कृष्ण प्रकाश यांनी शहरात मटका आणि अवैद्य धंदे चालू देणार नसल्याचे पहिल्याच दिवशी स्पष्ट केले होते. तेव्हापासून कारवाईचा धडाका सुरूच आहे. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने सांगवी आणि भोसरीमध्ये मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून 67 हजार 846 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. एकूण 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी रेल्वेस्थानक गेट जवळील मोकळ्या जागेत काही व्यक्ती जुगार खेळत आहेत. अशी माहिती सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांना मिळाली होती. त्यानुसार, संबंधित ठिकाणी छापा टाकला असता मटका मालक कृष्णा मोरे व इतर 11 आरोपी कल्याण मटका नावाचा जुगार खेळ खेळताना आढळले. त्यांच्याकडून एकूण 35 हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथील के.पी व्हिडीओ गेम पार्लर शिवराम येथे छापा टाकण्यात आला. यामध्ये संदीप गोयल, नितीन गोयल, एक महिला आणि इतर चार व्यक्तींवर कल्याण मटका खेळत असताना आढळले. त्यांच्याकडून 31 हजार 966 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.