पुणे - पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. इथे राज्यासह परराज्यातील कामगार काम करतात. परंतु, कोरोनाने थैमान घातल्याने आहे ते काम हातातून गेले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या मदतीला पोलीस धावले असून एक वेळचे जेवण, महिलांसाठी साड्या, सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांसाठी बिस्कीट, कपडे दिले जात आहेत. मात्र, शेकडो महिलांची स्वच्छता राखणे गरजेचे असल्याने महिला पोलीस अधिकारी स्मिता पाटील यांनी महिलांना नॅपकिन्स देण्याचे ठरवले त्याप्रमाणे शेकडो नॅपकिन्स महिलांना देण्यात आले आहेत. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अधिकारी शंकर अवताडे, राजेंद्र कुंठे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाणे आणि दिघी पोलीस ठाण्याच्या परिसरात अनेक कंपन्या आहेत. येथे परराज्यातून आलेले कामगार काम करतात. लॉकडाऊन झाल्यानंतर काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा, त्यांना पोलिसांनी पकडले आणि एका शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये सर्वांचे कपडे राहिले. सर्वांच्या जेवणाची सोय पोलीस करत आहेत. रात्री उशिरा डीसीपी स्मिता पाटील यांच्या हस्ते महिलांना साड्या, सॅनिटरी नॅपकिन तर लहान मुलांना बिस्कीट वाटण्यात आली.
शहरात जिथे जिथे निवारा केंद्र आहेत तिथे संबंधित वस्तू वाटणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील एकही मजूर उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही स्वतः घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंटे यांनी म्हटले असून यावेळी ते भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी त्यांच्या परिसरात तब्बल १० टन धान्य वाटप केले असून यात डाळ, गहू, तांदूळ, तेल, हे देण्यात आले. सर्व स्थानिक नेते कोरोनाला घाबरून घरात स्वतः ला क्वारंटाईन केले आहे. जेव्हा समाजाला नेत्यांची खरी गरज आहे अशावेळी कोणी पुढे येत नाही. पोलीस मात्र आपले कर्तव्य बजावत नागरिकांना एक वेळचे जेवण का होईना देत आहेत, अशी चर्चा होत आहे.