पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या शहरात 88 हजारांच्या उंबरठ्यावर कोरोना रुग्णांची संख्या आहे. शहरातील विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. अवघ्या एका महिन्यात तब्बल 33 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.
कशी होतेय कारवाई?
सर्वसामान्य नागरिक नियमांची पायमल्ली करत असून विनामास्क, सोशल डिस्टसिंग न पळता वावरत आहेत. याआधी महानगर पालिकेचे कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. आता मात्र पोलिसांकडे ही कामगिरी सोपवली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत 7 हजार 510 नागरिकांवर कारवाई करत तब्बल 33 लाख 32 हजार रुपये दंड पोलिसांनी वसूल केला आहे. तसेच, अनेकांवर 188 नुसार खटले दाखल केले आहेत. त्याच बरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. ज्या व्यक्ती दंड भरत नाहीत त्यांच्यावर 188 नुसार खटले दाखल केले जात आहेत. तिथे सुद्धा दंड आकारला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.