पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला महिलांनी चोप दिला आहे. या घटनेप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. हरिश शिवाजी धोतरे(वय- २४ रा. कामगारनगर) असे छेड काढणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना महिला दिनीच रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. यापूर्वीच आरोपीवर गुन्हा दाखल असल्याचीही माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.
हेही वाचा - 'त्या' प्रवाशांचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार मोठा निर्णय घेणार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐन महिला दिनादिवशी पिंपरी-चिंचवडमधील एच. ए वसाहतीमध्ये राहणारी तरुणी खासगी शिकवणी करून घरी जात होती. तेव्हा दबा धरून बसलेल्या सराईत गुन्हेगाराने १९ वर्षीय तरुणीला अचानक पाठीमागून मिठी मारली. घाबरलेल्या तरुणीने आरोपीचा प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षक, नागरिक आणि महिला धावत आल्या. हे सर्व पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला पकडून महिलांनी आणि नागरिकांनी चोप दिला. या प्रकरणी आरोपीला पिंपरी पोलिसांच्या स्वाधीन केले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार: ताहिर हुसेनच्या तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक