पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत एका 26 वर्षीय महिलेवर कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, तळेगाव पोलीस तपास करत होते. पीडित महिला कामावरून घरी जात असताना कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला होता.
या प्रकरणी नराधमाला जेरबंद करण्यात तळेगाव पोलिसांना यश आले आहे. करमवीर गुलाबराव जैसवार वय- 30 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेला आरोपीने मारहाण देखील केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 26 वर्षीय महिला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास चालत घरी जात असताना कोयत्याचा धाक दाखवून महिलेवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत बलात्कार करण्यात आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेचा तपास तळेगाव पोलीस करत होते.
दरम्यान, पीडित महिलेला नराधम आरोपीने बेदम मारहाण करत शिवीगाळ केल्याचे देखील फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पीडित महिलेने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले होते. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेप्रकरणी आरोपी करमवीर यास जळगाव जिल्ह्यातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, गुन्हे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.