पुणे - सोशल मीडियावर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे, पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना चांगलेच महागात पडले आहे.
सावित्रीबाई धुणी-भांडी करत होत्या, अशा आशयाचा मजकूर व्हायरल झाला होता. यावरून महापौरांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली. परंतु, असे कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले नसल्याचे स्पष्टीकरण महापौर उषा ढोरे यांनी दिले आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्यास माफी मागते, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर निषेध व्यक्त करत माफी मागावी, अशी भूमिका घेतली होती. यानंतर ढोरे यांनी संबंधित वक्तव्याप्रकरणी माफी मागून वादावर पडदा टाकला. व्हायरल झालेल्या वक्तव्याचा मजकूर सोशल मीडियावर पसरला होता. परंतु, कोणीही याची सत्यता पडताळण्याचे कष्ट घेतले नाही. ट्रोलिंग आणि विरोधी वातावरण तसेच आंदोलनामुळे त्यांनी माफी मागत वादावर पडदा टाकला आहे.
हेही वाचा :पिंपरी चिंचवड पोलिसांनी २९ जणांना चोरीस गेलेला ४७ लाखांचा मुद्देमाल केला परत
मी बोललेल्या अर्थाचा अनर्थ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे त्या म्हणाल्या. मी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही आणि बोललेलीही नाही. अर्थाचा अनर्थ करण्यात आला असून कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागते, असे त्या म्हणाल्या.