पुणे - मागील आठवड्यात पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सीमाभिंत कोसळून २२ जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात अशा घटना घडू नयेत म्हणून खबरदारी घेतली जात आहे. महानगरपालिकेने थेरगाव येथील केजूबाई बागेची धोकादायक संरक्षण भिंत काढून टाकली आहे.
भिंतीला तडे गेले असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून वेळीच भिंत जमीनदोस्त करण्यात आली. ही भिंत २५ मीटर लांबीची होती, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
केजूबाई बागेमधील संरक्षण भिंतीला तडे गेले होते. तेथे अनेक नागरिक लहान मुलांसह येतात. त्यामुळे महानगरपालिकेने जेसेबीच्या साहाय्याने भिंत काढून घेतली. अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून कमकुवत आणि तडे गेलेल्या भिंती काढण्याचे काम सुरू आहे.
पुण्याच्या कोंढवा आणि आंबेगाव येथे घडलेल्या वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये भिंती कोसळून तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून प्रशासन कामाला लागले आहे.